महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांचा बंगळुरूमध्ये गौरव सोहळा संपन्न

बंगळुरू (वार्ताहर): महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांचा आज बंगळुरू येथे भव्य पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नेत्या शिल्पा पाठक ठाकूर यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. शिल्पा पाठक ठाकूर यांनी आपल्या भाषणात संध्याताईंच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, काही लोक फक्त पदावर बसतात, पण काही लोक इतिहास घडवतात. संध्याताई सव्वालाखे हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पुढे सांगितले की, संध्याताईंचा जीवनप्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून संघर्ष, धैर्य, नेतृत्व आणि यशाची प्रेरणादायी गाथा आहे.त्यांच्या जीवनकथेमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या संघर्षमय प्रवासावर चित्रपट तयार करण्याचीही चर्चा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. संध्याताईंच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान देशभरात उंचावला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सलग तीन निवडणुका जिंकणे ही मोठी कामगिरी असून, तो जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची ताकद असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अनेक संकटे आणि आव्हानांचा सामना करताना संध्याताई कधीही खचल्या नाहीत, हीच त्यांच्या खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच, संध्याताईंच्या व्यक्तिमत्वातील ममता, आपुलकी आणि संवेदनशीलता यामुळे त्या सर्वांच्या ‘ताई’ बनल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संध्याताई सव्वालाखे यांचे अभिनंदन केले. “जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय महिला शक्ती” अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.

Post a Comment

0 Comments