पनवेल (प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे यांनी महापौरांकडे दोन महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये “महिला सन्मान स्वच्छता अभियान” आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे.महिला सन्मान स्वच्छता अभियानांतर्गत शहरात अत्याधुनिक “पिंक टॉयलेट्स” उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही केंद्रे केवळ स्वच्छतागृह न राहता महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मान लक्षात घेऊन विकसित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, वापरलेल्या नॅपकिन्सच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर, तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उपलब्ध असेल. सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा आणि २४ तास महिला रक्षकांची नेमणूक करण्याचाही प्रस्ताव आहे. याशिवाय या सुविधा केंद्रांमध्ये सौर ऊर्जा वापर, पावसाचे पाणी संकलन आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पॅनिक बटण अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील रेल्वे स्थानके, बाजारपेठा, बस स्थानके, उद्याने आणि शासकीय कार्यालय परिसरात पहिल्या टप्प्यात २५ ते ५० पिंक टॉयलेट्स उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत पनवेलमधील गृहसंकुलांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये सोसायटी स्तरावर वीज निर्मिती, कॉमन सुविधांसाठी ऊर्जा पुरवठा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा आणि नेट मीटरिंग यांचा समावेश असेल. त्यामुळे नागरिकांच्या वीज खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळणार आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) आणि CSR निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव असून, स्थानिक महिला स्वयं-सहायता गटांकडे व्यवस्थापन देऊन रोजगारनिर्मितीवरही भर देण्यात आला आहे.या उपक्रमांमुळे पनवेल शहरात महिला सुरक्षा, स्वच्छता आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती होऊन शहर “मॉडेल सिटी” म्हणून विकसित होईल, असा विश्वास ममता म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. संबंधित विभागांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून या योजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
कोट:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधून नैसर्गिक ऊर्जेला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याच्या धर्तीवर पनवेलमध्ये असे शाश्वत प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. ममता म्हात्रे यांनी मांडलेले प्रस्ताव लोकहिताचे असून त्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे मत भाजप नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केले.
0 Comments