पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खारघर परिसरात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात नेत्रा किरण पाटील व त्यांचे पती किरण पाटील यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून उघड बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही भूलथापा, अफवांना बळी न पडता प्रभागाच्या सर्वांगीण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी सुज्ञ मतदारांनी भाजप महायुतीच्याच अधिकृत उमेदवारांना मतदान करावे, असे ठाम आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.सन २०१७ मध्ये झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विश्वास दाखवत नेत्रा पाटील यांना उमेदवारीची संधी दिली होती आणि त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होत पाटील दाम्पत्याने पक्षशिस्त झुगारून देत भाजपकडे राजीनामा सादर केला आणि स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला.गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत भाजपच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे, पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रम आणि नागरिकाभिमुख योजना राबवण्यात आल्या. या संपूर्ण कालावधीत पक्ष संघटनेने नेत्रा पाटील व किरण पाटील यांना संघटनात्मक बळ, सहकार्य आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र या सर्व योगदानाचा सोयीस्कर विसर पाडत पाटील दाम्पत्याने केवळ स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांचा आता भाजपशी कोणताही संबंध उरलेला नाही. त्यामुळे भाजप महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक तसेच सामान्य नागरिकांनी या दाम्पत्याला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.खारघर आणि पनवेल शहराचा नियोजित, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार केवळ भाजप महायुतीच देऊ शकते. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाला किंवा बंडखोरीला थारा न देता भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन अविनाश कोळी यांनी शेवटी केले आहे.
0 Comments