पनवेल (प्रतिनिधी) : शासकीय आधारभूत पनवेल भात खरेदी केंद्रावर गुरुवारपासून भात खरेदीला अधिकृतरित्या सुरुवात होणार असून, त्यामुळे परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर भात खरेदी सुरू व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया सुरू होत असल्याने भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.दरवर्षी भात खरेदीला विलंब झाल्यास शेतकऱ्यांचा भात घरातच साठवून ठेवावा लागतो. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊन शेतकऱ्यांना मोठ्या चिंतेला सामोरे जावे लागते. त्या संदर्भात शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मांडली. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्काळ भात खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सदरच्या गोदामातील माल खाली होण्यास सुरुवात केली असून उद्यापासून शेतकऱ्यांच्या भात खरेदीला सुरुवात करण्याचे जिल्हा पणन अधिकारी श्री. ताटे यांनी आश्वासित केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भात खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून, शेतकऱ्यांना हमीभावाने भात विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, शासनाच्या आधारभूत दर योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
0 Comments