मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उपोषणाची सांगता

प्रतिनीधी/नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार व पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने मंगळवारी मागे घेण्यात आले. मंत्री प्रसाद लोढा यांनी उपोषणस्थळी भेट देत मुख्यमंत्र्यांच्या वतीने मागण्यांवर सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले. अधिवेशन सुरू झाल्यापासून हे उपोषण सुरू होते. १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ व डिजिटल मीडियाशी संबंधित ३३ मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. या ठरावांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संघटनेचे पदाधिकारी उपोषणावर बसले होते.मागील चार दिवसांत उपोषणस्थळी आमदार, खासदार व माजी मंत्र्यांनी भेट देत पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून मंत्री प्रसाद लोढा उपोषणस्थळी आले. “पत्रकारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.यानंतर मंत्री लोढा यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विश्वस्त व महाराष्ट्र समन्वयक किशोर कारंजेकर, राज्याध्यक्ष अनिल मस्के, नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे व राज्य कोअर कमिटीचे प्रमुख कल्पेश महाले यांना ज्यूस देऊन उपोषणाची अधिकृत सांगता करण्यात आली.यावेळी संदीप काळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, मागण्यांचा शासन निर्णय (जीआर) निघेपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments