पनवेल, दि. २७ : मुंबई उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासन सक्रिय झाले असून, त्यानुसार निरीक्षण, तपासणी आणि कारवाईची मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत.या मोहिमेचा एक भाग म्हणून आज दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उप आयुक्त मा. स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या १५ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी केली.
तपासणीदरम्यान साइटवरील धूळ नियंत्रण, बांधकाम साहित्याचे संरक्षित साठवण, जिओ-फेंसिंग किंवा कव्हरिंग, रस्त्यांवर धूळ नियंत्रणाची साधने, पाणी मारण्याची यंत्रणा, डेब्रिज व कचरा व्यवस्थापन आणि कामगारांची सुरक्षा साधने (विशेषतः मास्क वापर) यांसारख्या बाबींचे निरीक्षण करण्यात आले.
पाहणीत काही बांधकाम प्रकल्पांनी मार्गदर्शक नियमांचे योग्य पालन केल्याचे आढळले; मात्र काही ठिकाणी मार्गदर्शक नियमांचे अंशतः पालन किंवा गंभीर त्रुटी जसे की धूळ नियंत्रण उपाययोजनांचा अभाव आणि बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित बांधकाम प्रकल्पांना तत्काळ नोटिसा देण्याचे, दंडात्मक कारवाई करण्याचे आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.या पाहणीदरम्यान पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, कामोठे प्रभाग अधीक्षक दिपक शिलकन, खारघर प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी, लिपिक प्रवीण व्हळगल तसेच कर्मचारी स्वप्नील कांबळे उपस्थित होते.पनवेल महानगरपालिकेने नागरिक आणि प्रकल्प विकासकांना पर्यावरण संरक्षणाबाबत जबाबदारीने वर्तणुक करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
0 Comments