महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करुन दुरुस्ती व अत्यावश्यक सुविधा द्या - माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींचे सर्वेक्षण करुन दुरुस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरवण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीची सद्यस्थिती अत्यंत जीर्ण झालेली आहे. दुरुस्ती अभावी तेथे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, पिण्याचे पाणी, शेड, विद्युत दिवे, रस्ते, बसण्यासाठी बाकडे व स्वच्छतागृह अशा अत्यावश्यक सुविधा देखील अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अंत्यविधी करीता येणाऱ्या नागरीकांना नादुरुस्त स्मशानभूमी व त्याठिकाणी असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधांमुळे गैरसोयीस सामोरे जावे लागते. त्याठिकाणी आवश्यक सुविधा असणे ही महानगरपालिकेची नैतीक जबाबदारी आहे, असे निवेदनात नमूद करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, सर्व स्मशानभूमीमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, शेड, बसण्यासाठी बाक, स्वच्छतागृहे इत्यादी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुरक्षित राहिल यासाठी नियमित देखभाल व देखरेखीसाठी आवश्यकती यंत्रणा नेमण्याची व्यवस्था करण्यात यावी, स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी योग्य व दुरुस्त असा रस्ता बनविण्यात यावी अशा सुविधा त्यांनी या निवेदनातून सुचविल्या असून या विषयाचे महत्वपूर्ण गांभिर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींची सर्वेक्षण करुन दुरुस्ती व अत्यावश्यक सुविधा पुरविण्याकरीता योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments