शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल

पनवेल (प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
शेतकरी कामगार पक्षाचे आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे बदनाम आहेत. धमकावणे, मारहाण, खंडणी अशा गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल दि.बा. पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. याच विमानतळाच्या अनुषंगाने बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजी यांनी विमानतळबाधित पुनर्वसन या विषयावर वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र राजेंद्र पाटील यांनी मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राजेंद्र पाटील यांच्यावर उलवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम ३(१) (आर ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमिपुत्रांसाठी वेचले. याची थोडीशीही जाणिव न ठेवता राजेंद्र पाटील यांनी दिबांचे चिरंजीव अतुल दि.बा. पाटील यांचा अपमान करत दिबासाहेबांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घोर अपमान केला. त्यामुळे दिबासाहेबांच्या अनुयायींमध्ये राजेंद्र पाटील यांच्या विरोधात संताप उसळला आणि भूमिपुत्रांनी राजेंद्र पाटील यांचा जाहीर निषेधही करत आम्ही दिबासाहेबांच्या कुटुंबासोबत आहोत अशी शाश्वती अधोरेखित केली. त्याचबरोबरीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक गायकवाड गुरुजी यांचाही राजेंद्र पाटील यांनी अपमान केला. उलवे मध्ये राहणारे नामदेव रामचंद्र गायकवाड (वय -८३ वर्षे) हे बौद्ध समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून पेन्शनमधून उदरनिर्वाह चालवतात. शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाचे कार्यक्रमानिमीत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई येथे येणार असल्याने लोकमत वृत्तवाहिनीचे पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी उलवेचा झालेल्या विकासाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामाचे कौतूक केले होते. त्यामध्ये उलवे हा आमचा खेडेगाव होता, या भागामध्ये शहरीकरण झाल्यामूळे आमच्या गावामध्ये सुधारणा होवून आम्हाला चांगले दिवस आले व आम्हाला पक्की घरे मिळाली. तसेच विमानतळामूळे आमच्या भागातील जमिनींना चांगला भाव मिळाला असे रोखठोक मत मांडले होते. मात्र राजेंद्र महादेव पाटील यांनी रेतिबंदर परिसरात सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्राचा आरसा न्यूज या वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना मुलाखतीस अनुसरुन व राजेंद्र पाटील यांना गायकवाड गुरुजी अनुसुचित जातीचे असल्याचे माहिती असताना जातीचा पानउतारा करण्याच्या उद्देशाने सर्व लोकांना दिसेल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी उद्देशून 'लाचार होवून अर्धा किलो मटनासाठी गेलेल्या गायकवाड गुरुजींचा धिक्कार करतो' असे अपशब्द वापरुन जाहिरपणे वृत्तवाहिनीवर वक्तव्य करुन हेतूपुरस्सर अपमान केला आहे. वादग्रस्त वक्तव्य, सवंग प्रसिद्धीसाठी दादागिरी व दुसऱ्याचा अपमान करण्याचा ठेका घेणाऱ्या राजेंद्र पाटीलवर गायकवाड गुरुजींनी अखेर उलवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम ३(१) (आर ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबद्दल भूमिपुत्रांनी समाधान व्यक्त केले आहे तर लवकरात लवकर पोलीस प्रश्नासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षा गायकवाड गुरुजींनी व्यक्त केली आहे. 

कोट- 
लोकनेते दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वेचलं. त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजातील ज्येष्ठांचा अपमान हा संपूर्ण भूमिपुत्र समाजाचा अपमान आहे. भूमिपुत्र एकसंघ आहे, त्यामुळे आमच्या नेत्यांचा आणि समाजातील ज्येष्ठांचा अपमान करण्याचा अधिकार राजेंद्र पाटील यांना नाही. आजही अनेक ठिकाणी दलित आणि मागासवर्गीय समाजातील लोक अन्याय आणि अपमान सहन करत आहेत. अशा परिस्थितीत राजकीय स्थान असलेल्या व्यक्तींकडून जर असा प्रकार घडत असेल, तर त्यावर प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेतली पाहिजे. कायद्यापुढे कोणताही व्यक्ती मोठा नाही, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. समाजाला न्याय मिळावा, पीडितांना आधार मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. न्याय हा केवळ शब्दांत नाही तर कृतीतून दिसला पाहिजे, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित, समतावादी आणि न्यायप्रिय होईल.  
 -रुपेश धुमाळ, अध्यक्ष, भाजप- पनवेल तालुका पश्चिम मंडल तसेच अध्यक्ष -आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था.  

Post a Comment

0 Comments