नवी मुंबई - नेरूळ परिसरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज पत्रकार भवन स्थापन करून ते कार्यान्वित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नवी मुंबई येथील प्लॉट नं. १५ ए, सेक्टर-३८, नेरूळ येथे नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे “पत्रकार भवन” सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. परंतु राज्य शासनांतर्गत कार्यरत असणाऱ्या कोकण विभागीय उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सिडकोच्या अखत्यारीत असलेले “पत्रकार भवन” राज्य शासनाकडे ११ वर्षांसाठी करारांतर्गत सुपूर्द करण्यात आले असून ते अद्याप पर्यंत बंद आहे. तसेच बंद इमारतीची अंतर्गत पडझड होत असून नवी मुंबईतील नागरिकांच्या निधीरुपी पैशाचा अप्रत्यक्षपणे का होईना चुराडा होत आहे. तसेच “पत्रकार भवन” इमारतीवर सिडकोचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्याने नवी मुंबईतील पत्रकार, वृत्तपत्र संपादक, फोटो जर्नालिस्ट, व्हिडिओ जर्नालिस्ट तसेच ऑनलाईन-डीजीटल मिडियाचे प्रतिनिधी इत्यादींना संभाव्य सेवा-सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पत्रकार बांधवांना प्लॉट नं. १५ ए, सेक्टर-३८, नेरूळ येथे नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे “पत्रकार भवन” कार्यान्वित करून पत्रकारांना दिलासा देण्याची आवश्यकता असून सदर बाबींकडे शासनाने दखल घ्यावी, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विधीमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये औचित्याचा मुद्याद्वारे सदरची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
0 Comments