शिक्षकांच्या बदली तसेच पदोन्नतीबाबतचे अनेक प्रलंबित प्रश्न निकालात काढत, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा तणाव दूर करत होळीचा दिवस खऱ्या अर्थाने गोड केला. गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी शिक्षकांच्या विविध गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात मंत्री महोदयांसोबत संबंधित शिक्षकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मंत्री महोदयांना समजावून सांगितले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या पात्र मानून त्यांना बदली प्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. २०१९ साली काही शिक्षकांना शाळांवर रुजू होत असताना अवघड क्षेत्रात नियुक्त्या देण्यात आल्या. नंतर २०२२ साली ह्यातील बऱ्याच शाळा सोप्या क्षेत्रात घोषित करण्यात आल्या. परंत तरीही संबंधित सर्व शिक्षकांनी अवघड क्षेत्रात काम केले असल्याने २०२५ साली येणाऱ्या बदली प्रक्रियेत शासनाने ह्या सर्व शिक्षकांना समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न झाल्याने सदर शिक्षकांच्या बदल्या पुढील दहा वर्षांकरीता रखडल्या जाणार होत्या. शिक्षकांनी ह्याबाबत निवेदन देऊन, आंदोलन करण्याची भूमिका निश्चित केली होती. मात्र आमदार निरंजन डावखरे यांनी मंत्रीमहोदयांना सदर प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिले आणि मंत्री महोदयांनी ह्या सर्व शिक्षकांना बदली प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले व हा प्रश्न मार्गी लावला.
गेली कित्येक वर्ष या मागण्यांकरिता आग्रही असणाऱ्या शिक्षकांना असा दिलासा मिळताच त्यांना आनंदाश्रु रोखून ठेवता आले नाहीत. तसेच पालघर जिल्ह्यात विस्तार अधिकारी श्रेणी दोन, श्रेणी तीन केंद्रप्रमुख ह्या पदांवर पदोन्नती करत असताना, केवळ मुख्यध्यापक पदावर तीन वर्षे पूर्ण झाली नाहीत असे कारण देऊन मुख्याध्यापकांना पदोन्नती यादीतून वगळण्यात आले होते. मात्र इतर जिल्ह्यात हि पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे १० जून २०१४ च्या अधिनियमानुसार सदर मुख्याध्यपकांना पदोन्नती देण्यात यावी ह्याबाबत अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघ, पालघर जिल्हा यांच्यावतीने मागणी करण्यात आली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अनेकदा ह्याबाबत पाठपुरावा केला होता. मंत्री महोदयांनी मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्याबाबत देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. “माझ्या पदवीधर मतदारसंघातील शिक्षकांचे हे प्रश्न गेली अनेक दिवस रखडले होते. त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने त्या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून खूप आनंद झाला. प्रस्तावित मागण्यांची मंत्री महोदयांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार” अशी आमदार निरंजन डावखरे यांनी प्रतिक्रिया दिली. तर माननीय मंत्रिमहोदयांनी आपलं सरकार शिक्षकांच्या पाठीशी कायमच समर्थपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे जयकुमार गोरे तसेच आमदार निरंजन डावखरे यांचे विशेष आभार मानत, “आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.” अशी भावना सर्व शिक्षकांनी व्यक्त केली.
0 Comments