तरुणांनो उद्योजक व्हा : महेंद्रशेठ घरत

उलवे नोड, ता. २ : तरुणांनी नोकरीच्या मागे लागू नये आणि नोकरीत रमू ही नये, त्यापेक्षा उद्योजक व्हा, स्वत:चे अस्तित्व निर्माण करा, इतरांना नोकरी द्या, अशी भावना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी करंजाडे येथे रविवारी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते 'एसएसएस आर्किटेक्चर आणि प्लॅनर्स'च्या कार्यालयाचे उदघाट्न झाले त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्रेयस साळुंके, अवधूत म्हात्रे आणि प्रयाग खंडाळकर या त्रिमूर्तींनी एकत्र येऊन एसएसएसची स्थापना केली आहे.
महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले, ''मी सुद्धा एकेकाळी अकराशे रुपयांची नोकरी करीत होतो, पण परिस्थितीनुरूप कामगारांचे नेतृत्व स्वीकारले आणि लढा दिला. तो लढा मी जिंकला त्यानंतर आयुष्यात प्रत्येक वळणावर मिळेल त्या संधीचे सोने केले. म्हणूनच आज जगातील ७० देशांत स्वत: फिरलोय आणि इतरांनाही अनेक देशांची सफर घडवली आहे. मी जरी जग फिरलो असलो तरी मला कुठेही देव दिसला नाही, म्हणूनच मी माणसांत देव पाहतोय आणि तशीच सेवा करतोय. मी जर फक्त नोकरीच करीत राहिलो असतो तर आज नोकरच असतो त्यामुळे तरुणांनो, तुम्ही वेळीच निर्णय घ्या नोकरीत रमू नका. व्यवसायाची कास धरा, भले वडापाव विका, पण पदवी घेऊन दहा-पंधरा हजारांच्या नोकरीवर समाधानी राहू नका आणि आई-वडिलांनाही विसरू नका, असे आवाहन महेंद्रशेठ घरत यांनी तरुणांना केले. यावेळी 'एसएसएस आर्किटेक्चर आणि प्लॅनर्स'च्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments