पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला "महाराष्ट्राची महासंस्कृती" या दर्जेदार कार्यक्रम होणार आहे. सेक्टर १२ मधील प्लॉट क्रमांक ६ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल जवळील या मैदानावर सायंकाळी ०६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा आमदार महेश बालदी, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, समितीचे सरचिटणीस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. "महाराष्ट्राची महासंस्कृती"मध्ये महाराष्ट्राची लोककला, लोकसंगीत, गणगवळणी, लावणी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्यरचनांचा समावेश असून या कार्यक्रमात विशेषतः "शिवराज्याभिषेक सोहळा" सादर होणार असून या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments