लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील 'रामबाग' या अतिसुंदर उद्यानाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा हजारों नागरिकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात सोमवारी सायंकाळी साजरा झाला.नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठांची उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते. आणि त्यातच पारंपरिक आगरी-कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने वातावरणात स्फूर्ती आणली होती. स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली 'रामबाग' ही वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल, उरण, रायगड नवी मुंबई आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या गौरवाची ठरली आहे, विशेष म्हणजे 'रामबाग' आता पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त न्हावे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि म्हसेश्वर मंदिर समिती आणि रामबाग व्यवस्थापन कमिटीच्यावतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. 
या सोहळ्याला खासदार धैयशील पाटील, माजी मंत्री व विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर, श्री. म्हसेश्वर मंदिर कमिटी अध्यक्ष सि. एल. ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. 
वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री. सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पप्पू सूर्यराव, स्टेप आर्ट इंटरटेन्मेन्ट निर्मित व सनी संते प्रस्तुत 'हिच खरी आगरी कोळ्यांची दौलत' या पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने आणखी रंगत आणली होती. रामबागला भेट देणाऱ्यांना समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद दिसतो. रामबागच्या रूपाने या परिसराला आणखी एक चांगली ओळख मिळाली. राज्यातून विविध भागातील लोकं या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. अनेक उद्यानांना प्रवेश फी आकारली जाते मात्र रामबागेत प्रवेश विनाशुल्क आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत असले तरी सुविधा मात्र दर्जेदार आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी 'स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग' म्हणून ओळखली जात आहे. दुबईतील 'मिरॅकल गार्डन' च्या धर्तीवर १४ एकर जागेत उभारलेल्या या 'रामबाग' उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक आहेत. सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. त्यामुळे राज्यातील निसर्गप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ती संख्या तीन वर्षात लाखोंच्या पलीकडे गेली आहे. कौटुंबिक, तसेच विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणीमुळे निसर्गाचा आस्वाद या ठिकाणी घेता येत आहे. तसेच विद्यमान व पुढील पिढीला सुंदर वास्तू आणि मोकळ्या हवेत आणण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला रामबागच्या रूपाने हि एक चांगली पर्यटन वास्तू मिळाल्यामुळे या विभागाचे नाव मोठे झाले आहे.‘रामबाग’ हे उद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आदर्श व प्रेरणादायी सार्वजनिक उद्यान म्हणून नावारूपास आले आहे. आबालवृद्धांना आपलेसे वाटणारे हे उद्यान कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मनःशांती मिळवण्याबरोबरच येथे आरोग्यदायी चालण्यासाठी योग्य मार्ग, मुलांसाठी आकर्षक खेळाची साधने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी शांत, सुरक्षित आणि निवांत वातावरण उपलब्ध आहे. त्यामुळे ‘रामबाग’ हे उद्यान नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सामाजिक सलोखा आणि आरोग्यसंवर्धन यांचा सुरेख संगम येथे अनुभवायला मिळत असून, हे उद्यान सामाजिक बांधिलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.
 कोट- मी लहानपणापासून रामशेठ काकांना पाहिलेले आहे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपल्याला उपस्थितीत राहता येत आहे ते माझ्यासाठी भाग्य आहे. समाजामध्ये अनेक माणसे असतात कुणी राजकारणात यशस्वी असतो पण सामाजिक कार्यात नसतो. एखादा व्यवसायात यशस्वी असतो पण समाजकार्यात नसतो आणि एखादे समाजकार्यात यशस्वी असतो पण संस्थात्मक राजकारणात कुठेच नसतो आणि एखादा व्यक्ती या सगळ्यात असतो पण नातीगोती आणि माणसे सांभाळण्यात कमी असतो. परंतु सर्व क्षेत्रात यशस्वी आणि सर्व बाबींना स्पर्श केलेले एकमेव व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे रामशेठकाका. धनवान खूप आहेत पण आपले ऐश्वर्य लोकांच्या उपयोगी येईल याचा विचार ते करतात. १४ एकरच्या या जागेत कधीही झाडे उगवली नसतील ती उगविण्याची काम होत माणसाच्या आनंदाची इको सिस्टीम या ठिकाणी तयार झाली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आपल्या सर्वांसाठी आदर्श असून या विभागाचा ते कणा आहेत. 
                                                                 - खासदार धैर्यशील पाटील 
कोट- रामबाग शब्दाने या परिसराला दिशा देणारा मार्ग केला आहे आणि या रामबागेमुळे ग्रामीण भागात चैतन्य निर्माण केले आहे ते लोकनेते रामशेठ ठाकूर या दानशूर व्यक्तीमत्वाने. स्वतःच्या पैशाचा उपयोग ते जनतेच्या हितासाठी करतात. रामबाग हे या परिसराच्या नव्हे तर जिल्ह्याच्या अग्रस्थानी आहे. या परिसराच्या विकासाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी योगदान दिले आहे. या उद्यानाने आकर्षणाची सर्वावर भुरळ घातली आहे, त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी येत असतो. रामबाग हे निसर्गरम्य असे पर्यटन स्थळ आहे. लोकांसाठी उभारलेल्या या उद्यानाचा खर्च ते स्वतः करत आहेत त्यामुळे असे दानशूर व्यक्तिमत्व कुठेही भेटणार नाही. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा उपयोग गोरगरिबांच्या सेवेसाठी होत आहे, त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा! - आमदार रवीशेठ पाटील 
कोट- लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जन्म आणि बालपण न्हावाखाडी झाले. गावाला काही तरी दिले पाहिजे या भावनेतून आणि ग्रामस्थ, म्हसेश्वर मंदिर कमिटीच्या संकल्पनेतून रामबागची उभारणी झाली. अटल सेतूमुळे हा भाग मुंबईशी जवळ जोडला गेला. निसर्गरम्य सौंदर्य या ठिकाणी असल्याने येथून ये जा करणाऱ्या लोकांना रामबागचे आकर्षण झाले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सामाजिक कार्य सुरु आहे. या परिसराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे आहे आणि ते यापुढेही मिळत राहील. - आमदार प्रशांत ठाकूर 

कोट- लोकनेते रामशेठ ठाकूर हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी लोकांसाठी लोकसेवेचे साम्राज्य उभारले. लोकांसाठी दुबईच्या धर्तीवर असलेल्या मिरॅकल गार्डनची प्रतिकृती उभारली आहे. शाळा व्यवसाय म्हणून काही जण बघतात पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षणाचे जाळे गोरगरिबांसाठी केले आहे. ते शिक्षण महर्षी शिक्षण तपस्वी आहेत, त्यामुळे तो अभिमान आपल्यासाठी खूप मोठा वाटतो. माणसे आणि समाज तेच असतो पण माणसे जोडण्याची ताकद लागते त्यामुळे ते माणसे जोडणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या मागे प्रचंड तपश्चर्या आहे आणि त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. जीवन तीन पानाचे असते. पहिले पान म्हणजे आपला जन्म जो ईश्वराने लिहून आपल्याला दिलेला असतो. तिसरे पान म्हणजे मृत्यू तो सुद्धा ईश्वराने आधीच निश्चित केलेला असतो. पण यामधील एक महत्त्वाचं पान आपल्या हातात असते ते म्हणजे मधले पान आपलं आयुष्य कसं घडवायचं, कसं जगायचं आणि काय मागे ठेवायचे हे ठरवणारे पान आहे. हे मधलं पान आपण कशा प्रकारे भरतो, यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत ठरते. काही लोक हे पान रिकामं ठेवतात, काही साध्या ओळीत भरतात, तर काही थोर व्यक्ती आपल्या कर्माने, विचाराने आणि कार्याने हे पान सुवर्णाक्षरांनी भरून ठेवतात. आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भरभरून ठेवले असून त्याचा आदर्श त्यांच्याकडून घ्यावे लागेल. - बाळासाहेब पाटील, माजी सभापती - कोकण म्हाडा 




Post a Comment

0 Comments