पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नावा संदर्भात मंगळवारी लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुरुवातीपासूनच विमानतळ प्रकल्पबाधित २७ गाव संघर्ष समिती ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दि. बा. पाटील नामकरण कृती संघर्ष समितीच्या बरोबर असून, पुढेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या प्रसंगी २७ गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, उपाध्यक्ष सी. टी. पाटील, प्रवक्ते रुपेश धुमाळ, सहसचिव चेतन डाऊर, संपर्क प्रमुख किरण पवार, पद्माकर पाटील, समीर केणी तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या भेटीबाबत समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या २७ गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित विविध प्रशिक्षण मिळावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे परिसरात आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून उलवे नोड येथील सेक्टर १२ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित प्रशिक्षण दिले जात आहे. या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीच आज ही भेट घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रेम पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण २७ गाव संघर्ष समिती ही लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही या भेटीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, हे पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केल आहे.
0 Comments