खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी चर्चा

अलिबाग (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मधील राजकीय पक्ष पदाधिकारी, संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सोमवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी खारघर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये खारघर मधील कायमस्वरूपी दारूबंदी घोषित करण्यासंदर्भात करावयाची शासकीय प्रशासकीय मतदान प्रक्रिया याबाबत चर्चा करण्यात आली. करण्याबाबत राज्य शुल्क अधिकारी व जिल्हाधिकारी रायगड यांनी उभी बाटली आडवी बाटली निवडणूक प्रक्रिया कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी निवडणूक घायची आहे तेथून २५ टक्के मतदारांचे निवडणुकीसाठी अर्ज केल्यास मतदान घेतले जाईल. विधानसभेची मतदार यादी या प्रक्रियेसाठी वापरण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राबवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. खारघर संघर्ष समितीला दारूबंदीसाठी व निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.खारघरमध्ये संपूर्ण दारूबंदी करण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते.
 तसेच दारूबंदीसाठी योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे. आणि या संदर्भातील प्रक्रिया करण्यासाठी शासनाने पाठिंबा द्यावा, अशी मागणी लक्षवेधी सूचनेतून केली होती. खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासित केले होते. या संदर्भात पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खारघरमध्ये संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी मतदानाबाबत चर्चा केली. खारघरमधील तीन प्रभागांमधील २५ टक्के मतदारांनी संपूर्ण दारूबंदीसाठी अर्ज दिल्यास मतदान घेत येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यानुसार आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments