स्व. रावसाहेब शिंदेंच्या आठवणींना उजाळा

पनवेल (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दिवंगत अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांची जयंती, ज्युनिअर कॉलेजच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी (दि. 11) श्रीरामपूर येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अ‍ॅड. शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेऊन आठवणींना उजाळा दिला.अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, खासदार निलेश लंके, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमकेसीएलचे अध्यक्ष विवेक सावंत, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, अरुण कडू, मीनाताई जगधने, अविनाश आदिक, डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, टी.ई. शेळके, डॉ. शंकरराव गागरे, लकी सेठी, रोहित शिंदे, रश्मी शिंदे आदी उपस्थित होते. संगणक साक्षरतेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवणारे एमकेसीएलचे प्रमुख विवेक सावंत यांना या वेळी अ‍ॅड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे, नवनवीन संधी देणारे रावसाहेब शिंदे यांचे योगदान अमूल्य आहे. आज ते हयात असते, तर आपण त्यांच्या जन्मशताब्दीचा मोठा सोहळा साजरा करत असतो.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, रावसाहेब शिंदे हे जीवनभर गरिबांसाठी जगले. त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्या जीवनावर झाला, असे सांगून संस्थेच्या कार्यासाठी 50 लाख रुपयांची अतिरिक्त देणगी जाहीर केली. रावसाहेब म्हणायचे, जो देतो तो देव, जो राखतो तो राक्षस. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी ही मदत करत आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. पुरस्कारार्थी विवेक सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, दहीहंडीमध्ये शेवटी वरचा मुलगा बक्षीस घेतो, पण त्याला वर नेणारे, सर्व मजले उभारणारे सहकारी खरे योगदान देणारे असतात. आजचा हा सन्मान माझ्या पालकांचा, गुरूजनांचा, सहकार्‍यांचा आणि पत्नी डॉ. संगीता सावंत यांचाही आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करताना रावसाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे वातावरण दिले. त्यांच्या जाण्याने रिक्तता निर्माण झाली असली, तरी त्यांनी लावलेले ज्ञानाचे रोप आज वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. डॉ. चंद्रकांत दळवी, विवेक सावंत, भगीरथ शिंदे आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रेरणा शिंदे, उपस्थितांचे स्वागत डॉ. राजीव शिंदे आणि सूत्रसंचालन प्राचार्य विनोद रोहमारे व प्राचार्य वर्षा धामोरे यांनी केले, तर आभार रोहित शिंदे यांनी मानले

Post a Comment

0 Comments