लाडक्या बहिणींचे परदेश प्रवासाचे स्वप्न महेंद्रशेठ घरत यांनी केले पूर्ण!

उलवे नोड, ता. १४ - परदेशात पहिल्यांदाच घरत परिवारातील अनेक लेकी-सुना, लाडक्या बहिणी यांनी रविवारी (ता.९) प्रयाण केले . महेंद्रशेठ घरत यांनी शेलघरमधील आपल्या 'सुखकर्ता' बंगल्याजवळून विमानतळावर जाण्यासाठी आलिशान बसची सोय केलेली होती, पहाटे चारच्या सुमारास 'सुखकर्ता' बंगल्याजवळ शुभांगी घरत आणि महेंद्र घरत हे उभयता लाडक्या बहिणींच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्यांनी भल्यापहाटे या लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बस छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाकडे रवाना झाली. विमानतळावर गेल्यावर लाडक्या बहिणी थोड्याशा भांबावल्या, कारण सुसज्ज विमानतळावर त्या पहिल्यांदाच गेल्या होत्या. कुतूहलमिश्रित हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, विमानात चढतेवेळी लाडक्या बहिणींच्या मनात घालमेल सुरू होती, पण प्रवासात मदतीला महेंद्र घरत यांचे विश्वासू सहकारी वैभव पाटील, प्रसिद्ध छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर आणि गाईड पेरुमल होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना तो मोठा आधार होता, सकाळी ८ च्या सुमारास विमान दुबईच्या दिशेने झेपावले आणि काही बहिणींच्या पोटात गोळा आला; परंतु विमानातील इतर प्रवाशांना पाहून त्या सावरल्या आणि ११ च्या सुमारास विमान दुबईला पोहचल्यावर लाडक्या बहिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला.
जगातील सर्वांत उंच इमारत गणली जाणारी 'बुर्ज खलिफा' पाहिल्यानंतर या लाडक्या बहिणींना आकाश ठेंगणे झाले. नयनरम्य, सुंदर मिरॅकल गार्डन, आव्हानात्मक डेझर्ट सफारी, अत्याधुनिक लिमोझीन गाडीची सफर, सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले मीना बाजार पाहून तर या लाडक्या बहिणींना सोन्याची खाण दुबई अशी भावना झाली. प्रवासात लाडक्या बहिणींनी कोळी गीतांवर धम्माल नृत्य केले, त्यात शुभांगी घरत आणि महेंद्र घरत यांनीही ठेका धरला आणि लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित केला. दुबईचा मनसोक्त आनंद घेऊन गुरुवारी लाडक्या बहिणी मध्यरात्री सुखरूप पुन्हा शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्यावर आल्या. या सर्व लाडक्या बहिणी, लेकी-सुना यांनी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगी घरत यांचे आभार मानत तुमच्यामुळेच आम्ही दुबई पाहिली आणि विमानातून प्रवास केला अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "माझ्या कुटुंबातील लेकी-सुनांना, लाडक्या बहिणींना दुबईची सफर घडवल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे आणि मानसिक समाधानही मिळाले. मी तर जग फिरतो परंतु या लेकी सुना,बहिणींचे स्वप्न होते परदेश प्रवासाचे ते मी पूर्ण केले मी माझे कर्तव्य केले असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments