पनवेल, (प्रतिनिधी) : आमदार स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी साहित्य, गार्डन सुशोभीकरण आणि वॉकिंग ट्रॅक या लोकोपयोगी विकासकामांचे लोकार्पण विचुंबे येथील डायमंड ग्रीन व्हॅली येथे उत्साहात संपन्न झाले. कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुसज्ज परिसर मिळावा तसेच लहान मुलांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात खेळता यावे, या उद्देशाने ही विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सुविधांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब पाटील यांनी जपलेल्या जनसेवा आणि विकासाच्या वारशाचा उल्लेख करत नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा विकासकामांची आवश्यकता अधोरेखित केली. नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच अशा कामांचे खरे यश असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघाचे आकाश पाटील, माजी सरपंच नम्रता आकाश पाटील, बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोईर, अनंत गायकवाड, शाम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानण्यात आले.परिसरातील नागरिकांनी या विकासकामांचे स्वागत करत अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
0 Comments